Skip to content

झिपरी ज्वारी

By:

संजय पाटील, मावंजी पवार आणि अरुण गावित

पाडा / Pada/ Hamlet

जव्हार

खेडे / village

तालुका / Taluka / Block

जव्हार

जिल्हा / District

पालघर

राज्य / State

महाराष्ट्र

पिकाबद्दल माहिती / Information about the crop.

झिपरी गेली कुठ ? आपण सहज म्हणत असतो की “नावात काय आहे?” आता हेच पहा ना – झिपरी हा शब्द आणि ज्वारी पिकाचा काय संबंध असू शकतो का? मला पडलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर श्री.मावंजी पवार ह्या माझ्या सहकाऱ्याने चुटकीसरशी दिले –“झिपऱ्या केसांसारख पसरलेल कणीस, म्हणून झिपरी जोरी(ज्वारी).”पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात ज्वारी चा वाण आहे त्या वाणाला झिपरी ज्वारी म्हणतात. माझा दुसरा सहकारी श्री.रामचंद्र गावित ह्याचेशी गप्पा मारत असताना मी सहज विचारले की झिपरी ज्वारी आता कमी झाल्यासारखी वाटते? १० वर्षा पुर्वी सगळीकडे ह्या ज्वारीची कणसे वाऱ्याने डोलताना दिसायची आणि लक्ष वेधून घ्यायची. तो उत्तरला – “पयले(पूर्वी) कुडाची घर होती अन कुड बांधायला झिपरीच साठ(धाटे) उपेग (उपयोग) केल जायचं ,दोन तीन वरीस (वर्ष) टिकायचं, आत्ता घरकुल योजना आल्यापासन सगळी सिमेंट ची घर बांधत्यात, तै(त्यामुळ) झीपरीच्या साठचां काय उपेग (उपयोग?)” त्याच्या उत्तराने मी सुन्न झालो. घरकुल योजनेचा संबंध सरळ झिपरी ज्वारीचा वाण कमी होण्यास कारणीभूत? झिपरी ज्वारी ही उंच वाढणारी, काटक, अधिक पाऊसात तग धरणारी, न लोळणारी आणि मुख्य म्हणजे दगडाळ खडकाळ जागी येणारा ज्वारीचा वाण. झिपरी ज्वारीचे लांब साठ(धाटे)) काटक असल्याने त्याचा उपयोग घरासाठी कुड (भिंत) तयार करण्यासाठी होत होता, शेण, माती ह्याचे मिश्रण करून झिपरी ज्वारी पासून बनविलेल्या कुडाच्या भिंतीना लीपून घेतला जायचा. दोन ते तीन वर्षे हि कुडाची भिंत व्यवस्थित राहायची. ह्या भिंतीमुळे घरात कायम आल्हाददायक वातावरण असायचे… वारली आणि कोकणा समाजातील आदिवासी बांधवानी ह्याची मुख्य पिक म्हणून कधी लागवड केली नाही. भात किवा नाचणी, वरईचा राब केल्यावर रोपे टाकताना त्यांमध्ये झिपरीचे मुठभर बियाणे मिसळून फेकून द्यायचे, २५-३० दिवसात भाताची/ नाचणी, वरईची रोपे लागवडीसाठी काढून घेतली की मग राबावर ह्या ज्वारीची रोपे जोमदार पणे वाढतात. इतर कोणत्याही खताची, मशागतीची अजिबात गरज नाही. काही ठिकाणी नाचणी ची रोपे लागवड करताना ठराविक अंतराने झिपरी ज्वारीच्या ओळी टाकतात तसेच तूर-ज्वारी अशी मिश्र पिक पद्धती आढळून येते. काही ठिकाणी ज्वारीचे रोपावर चवळी चा वेल वाढलेला दिसतो आणि त्यावर लटकणाऱ्या चवळीच्या शेंगा लक्ष आकर्षित करून घेतात, ह्यामध्ये आदिवासी शेतकऱ्याचा जमीनच्या वापराचा आणि त्यातून विविध पिके एका वेळी घेण्याचे शहाणपण लक्षात येते. ह्या ज्वारीच्या पिक पद्धतीचा अभ्यास करीत असताना श्री.संदीप टेंबरे, खरबा (रायतळे) ह्यांचे शेतावर गेलो असताना तिथे नाचणी+ ज्वारी+ चवळी+ अंबाडी आणि नाचणी+ तूर+ ज्वारी+ चवळी+ अंबाडी अशी मिश्र पिक पद्धती आढळली. घराच्या कुडासाठी ज्वारीचे साठ(खोड) नेताना झिपरी ज्वारीची जून चे दुसऱ्या आठवड्यात पेरणी होते आणि नोव्हेबरचे मध्यापर्यंत काढणीस येते म्हणजे जवळ जवळ ५.५ महिन्याचा कालावधी लागतो. झिपरी ज्वारीचे कणीसातील प्रत्येक दाणा हा काळ्या किवा लाल रंगाच्या कोंदणात झाकलेला असतो. ते कोंदण अर्ध्याचे वर उघडले की ज्वारी काढणीस आली असे मानले जाते. मग प्रथम कणसे काढून घेतली जातात आणि काही दिवसांनी साठ (धाटे) कापून घेले जाते आणि कणसे खळ्यावर वाळवली जातात. नंतर लाकडाच्या दांडाने झोडून दाणे वेगळे केले जातात. झिपरी ज्वारीची पाने जनावरांना चारा म्हणून वापरली जातात आणि साठ (धाटे) हे घराचे कुडासाठी वापरले जाते. त्याचबरोबर नाचणीची कापणी झाल्यावर त्याची कणसे ठेवणेसाठी ज्वारीच्या साठापासून मांदुस (ज्वारीच्या साठा उभ्या करून त्याला गोलाकार आकार दिला जातो आणि आतून सागाची पाने लावली जातात) बनवले जाते.ह्या ज्वारीची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात त्यामुळे मातीची धूप कमी होण्यास मदत होते. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी भागात झिपरी ज्वारी आढळते. ह्या भागात सर्व्हे केल्यावर लक्षात आले की झीपरी ज्वारी मध्ये पाच वेगवेगळे प्रकार आहेत – काळ्या बोंडाची (गरवी), सफेद बोंडाची, गोंडेवाली, काळ्या बोंडाची (निमगरवी), लाल बोंडाची. काळ्या बोंडाची, सफेद बोंडाची आणि लाल बोंडाची हे प्रकार दाण्याच्या वरील आवरणावरून पडले आहेत आणि गोंडेवाली हे नाव पडले ते म्हणजे दाणे एकत्र गोंड्याने असतात म्हणून. काळ्या बोंडाची निम गरवी ज्वारी हे नाव पडले कालावधीनुसार. अ.न ज्वारी वाणांचे नाव उंची (फुट) कणीस लांबी (सेमी) एका कणसाचे वजन (किलो) पक्क्वता कालावधी (दिवस) १ काळ्या बोंडाची झिपरी ज्वारी (गरवी) १२.५ ३७.५ ०.१२ १४०-१४५ २ सफेद बोंडाची झिपरी ज्वारी ११.३ ३८.७ ०.०९० १४५-१५० ३ गोंडेवाली ज्वारी १४.८ ३१.१ ०.०७० ११५-१२० ४ लाल बोंडाची झिपरी ज्वारी १२.८ ३५.९ ०.०९५ ११५-१२० ५ काळ्या बोंडाची झिपरी ज्वारी (निमगरवी ) १३.७ ३१.९ ०.०७५ १३५-१४० सफेद बोंडाची झिपरी ज्वारी बियाणे काढताना वजनदार ,रोग व कीड विरहीत, मजबूत खोड असलेली, लांब कणीस असलेले निवडले जाते आणि त्याचे दाणे वेगळे करून बांबू पासून बनवलेल्या झिल्यात ठेवले जाते. ह्या ज्वारीवर पाने खाणारी आळी, खोड किडा, तांबेरा अश्या रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो पण नुकसानीची पातळी कमी असल्याने त्यावर कोणतेही उपाय योजना केली जात नाही. श्री.सुनील भोये ह्यांचेशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले – “भात अंन नागलीची रोप काढल्यावर राबाची जागा रिकामी पडतीया, त्यामुळ ज्वारी टाकतूया आणि त्येच्या आंबील अन फुले (लाह्या) बी खायला चांगल्या असत्यात” ह्यांनी काळ्या बोंडाची (गरवी) झिपरी सांभाळून ठेवलीय.सुनील पुढे म्हणाला – “पूर्वी घरात खायला काय नसायाच तेवा झिपरी ज्वारीची आंबील खावून दिवस काढलेत लोकांनी” सुनीलच्या आईने सांगितले की आंबील करताना ज्वारी किवा नाचणी जात्यावर भरड दळायाची आणि संद्याकाळी गरम पाण्यात भरड भिजत घालायची म्हणजे आंबील चवीला चांगली होते. श्री.सुरेश लाडक्या कोंब बोलले – “मी सफेद बोंडाची झिपरी राखलीय (जपलीय) – “भाकरी साठी चांगली हाय, आमच्या वारली समाजात “बीज” सण मगशीर (मार्गशीर्ष) महिन्यात रहतो असतोतेवा (तेव्हा) ज्वारी कापली की तेचे (त्याचे) पीठाचे लाडू बनवून देवाला निवद (नैवद्य) दाखवतात, शेतातली अवजारे पूजा केली जातीय (जाते), अंन तै पासन (त्यानंतर) आंबील अन भाकरी बनवायल उपेग (उपयोग) करतू (केला जातोय)” “लाल बोंडाच्या झिपरीची पान रुंद असत्यात, चार (चारा) म्हणून उपेग (वापर) करतू (केला जातोय) अन मळणी करताना खाजवत (खाज) नाय” श्री.देविदास बरफ ह्यांनी लाल बोंडाची झिपरी ठेवण्यामागची त्याची भूमिका मांडली. श्री.रघु रामा गावंढा ह्यांचेकडे काळ्या बोंडाची (निम गरवी) झिपरी मिळाली, “दरम्बाट (दगडाळ), मुरबाट (मुरमांड) जमनीत(जमिनीत) तग धरतिय (धरते), तसच इतर पिकांबरोबर गोळाटायला (कापणीस) येय (येते), त्यामुळ पाकारापास्न (पक्षी) पासन(पासून) लुक्सान (नुकसान) कमी होत (होते)” “गोंड्या सारखी दिसतिया (दिसते), तै (त्यामुळे) हिला गोंडेवाली ज्वारी म्हणत्यात, निबर (पक्व) झाल्याव (झालेवर) गोळाटायला (कापणीस) उशीर झाला तरी दाण कणसातन (कणीसातून) निघून पडत नाही अन मळायला (मळणीस) बी सोप(सुलभ) हाय” श्री.शंकर लहानू वरठा ह्यांनी नावामागचे स्थानिक ज्ञान आणि त्यांचा दृष्टीकोन मांडला. जव्हार तालुक्यातील पाथर्डी मधील श्री.किसन लक्ष्मण दापट ह्यांनी त्यांची कैफियत मांडली – “डुक्कर लई तरास देत्यात,झिपरी काढणीस तयार झाली की नासधूस करत्यात, बोन्डाला दाणा बी राकत नाय.त्यामूल कोन करत नाय.” २०१० मध्ये जागतिक कीर्तीच्या पर्यावरण तज्ञ आदरणीय डॉ. वंदना शिवा जव्हार ला आल्या होत्या, तेव्हा बायफ चे अध्यक्ष श्री.गिरीश सोहनी सर म्हणाले होते –“Knowledge of Biodiversity cannot be locked in Books, reports and museums, it should be in live form in the field with the communities then only it will survive “ ज्याचा प्रत्यय मला वेळोवेळी येत असतो आणि हे वाक्य भानावर राहून लोकांबरोबर काम करण्यास भाग पाडते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ञ पद्मभूषण श्री.माधव गाडगीळ सरांचा नेहमी आग्रह की “स्वस्थळी संवर्धन” जे ह्या कामाचे मुख्य ध्येय वाक्य ठरले आहे. झिपरी आणि उतावळी ज्वारी पासून बनविले जाणारे विविध पदार्थ : आदिवासी भागात ह्या ज्वारीची आंबील आणि फुले (लाह्या) हे दोन खूप महत्वाचे पदार्थ त्याबरोबर काही कुटुंबात भाकरी पण केली जाते. ह्यामधील सफेद बोंडाची आणि काळ्या बोंडाची ज्वारी चे खोड चवीस गोडसर असल्याने उसासारखे खाल्ले जाते. आंबील – ज्वारीपासून रवाळ प्रकारचे पीठ ज्यात्यावर बनवले जाते, वाटीभर पीठ संध्याकाळी पाण्यात चांगले मिसळून भाजलेल्या मातीचे मडक्यात उंच ठिकाणी शिक्याव्र्र टांगून ठेवले जाते, सकाळी पाणी गरम केले जाते आणि मंद आचेवर ठेवून त्यामध्ये हळू हळू हे आंबवलेले पीठ सोडले जाते, हे करत असताना सतत ढवळले जाते आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातले जाते आणि गरम असताना पिण्यास घेतले जाते. सकाळी शेतावर जाताना आंबील घेतले तर तहान कमी लागते त्याच बरोबर भूक पण नियंत्रित ठेवली जाते, हि पचनास हलकी असून सर्वांसाठी उर्जावार्धक म्हणून वापरता येते. फेब्रुवारी नंतर आंबील घेण्यास सुरुवात केली जाते आणि पावसाळा सुरु होईपर्यत घेतली जाते. वांगणपाडा गावात महिलांशी चर्चा करताना समजले की दुष्काळाचे वेळी त्यांनी अनेक दिवस आंबील पिवून काढले. भाकरी : ह्या ज्वारीपासून भाकरी पण बनविता येते, पण पालघर आणि ठाणे जिल्ह्यात ह्याची भाकरी रोजच्या आहारात बनवीत नाहीत. फुले फोडणे (लाह्या) : मोठ्या तोंडाच्या अल्यूमिनियम च्या पातेल्यात ज्वारी गरम केली जाते. शिंदवळ (खजरी) च्या पानापासून शिराव (झाडू) बनविला जातो आणि त्याचा उपयोग पातेल्यातील ज्वारी हलविण्यास केला जातो. ताडताड आवाज करत ज्वारी फुटण्यास सुरुवात होते तेव्हा वरून झाकण ठेवले जाते. तयार झालेल्या लाह्या हवा न लागता ठेवल्या तर १० दिवसापर्यंत आणि त्याचे भरड एक महिना पर्यंत ठेवता येते. ज्वारीच्या लाह्या उंडे : लाह्या करताना न फुटलेले दाणे बाजूला करून त्याची भरड (जाडसर पीठ) बनवली जाते आणि ते पीठ मधात मिसळून उंडे (लाडू) बनवले जातात ज्वारीचे पोहे : ज्वारीचे पिक पक्वते कडे गेल्यावर, त्याचे दाणे काढून पातेल्यात भाजून उखळात कुटतात आणि ते पोहे खाण्या साठी वापरतात, ते तीन चार दिवस ठेवता येते. ऊळा पाडणे- ज्वारीचे पिक पक्वते कडे गेल्यावर कणसे काढून खडकावर गवत पसरतात आणि त्यावर कणसे ठेवून गवत जाळतात. नंतर राख पानाने झाडून गोळा करून खाण्यासाठी वापरतात. कोकणी भाषेत त्याला “उळा पाडणे” असे म्हणतात. ज्वारीची कोंडी :प्रथम ज्वारीच्या लाह्या तयार करून त्यामध्ये साखर मिसळून जात्यावर दळून घेतात,तयार केलेले मिश्रण किमान आठ दिवस व्यवस्थित राहते,लहान मुले आवडीने खातात (किसन लक्ष्मण दापट,पाथर्डी) सांस्कृतिक महत्व : ह्या ज्वारीच्या लाह्या आणि लाडू मुख्यत संक्रात, नागपंचमी आणि गणपती चे सणामध्ये प्रसाद म्हणून खाल्या जातात. ज्वारीच्या भरड पासून बनविलेले उंडे (लाडू) उपवासात खाल्ले जातात. आरोग्याचे दृष्टीने महत्व :सकाळी शेतावर जाताना आंबील घेतल्यावर बराच काळ तहान लागत नाही आणि उर्जा टिकून राहते. झिपरी ज्वारी ह्यांचे वातावरण बदलात खूप महत्व आहे कारण अधिक पाऊसात तग धरून उत्पन्न देते, दाणे काळे पडत नाहीत, वारा, वादळ ह्यात लोळत नाही, रोग व किडीस दाद देत नाही, पोषण दृष्ट्या समृद्ध असून विविध पदार्थ बनविण्यासाठी उपयुक्त आहे, तसेच जळण म्हणून पण उपयोग केला जातो. हे ज्वारीचे वाण अन्न, पोषण आणि वातावरण बदलात किती मोठे काम करू शकतात ही जाणीव झाली आणि झिपरी आणि उतावळी ज्वारीच्या संवर्धन आणि वापर साठी काय करता येईल ह्याचा विचार सुरु झाला, ज्यामध्ये ज्वारीच्या ह्या विविध वाणाचे बियाणे संकलन, धान्य आणि काड (stem) ह्याचे पोषण तत्वाचा अभ्यास, लाह्या आणि आंबील चा पोषण साठी उपयोग, नवीन पदार्थ निर्मितीसाठी अभ्यास, पिक लागवडीमध्ये ज्वारीचा समावेश (अधिक पावसात तग धरणे, मिश्र पिक म्हणून वापर), ज्वारीच्या काढा पासून (stem) विविध उपयोगाच्या शक्यता, तपासणे (बांधकाम, छत इत्यादी). रामचंद्र गावित, मावंजी पवार, सुनील भोये, सुरेश कोंब, देविदास बरफ, रघु रामा गावंढा, शंकर वरठा, चांगुणा डगळे, रंजना डगळे, संदीप टेंबरे, खंडू भांगरे, योगेश नवले ह्यांचा झिपरी आणि उतावळी ज्वारी बद्दलचे ज्ञान आणि हे दुर्मिळ वाण वाचवण्यासाठी ची धडपड खूप काही शिकवून गेली. आज खूप काही गवसलं,शहाणपणातून समृद्धीच्या वाटा कश्या तयार होतात ह्याची मनोमन जाणीव झाली अन मला भारतीय व्यवस्थापन संस्था (Indian Institute of Management –IIM),अहमदाबाद चे माजी प्राध्यापक आणि राष्ट्रीय इनोव्हेशन फौंडेशन(National Innovation Foundation) चे माजी उपाध्यक्ष डॉ.अनिल गुप्ता सरांचे एक वाक्य आठवल ——— “Minds at the Margin are Not Marginal Minds “ संजय पाटील प्रकल्प समन्वयक (कृषी जैव विविधता) बायफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहूड अँड डेव्हलपमेंट (BISLD) , डॉ.मणिभाई देसाई नगर ,वारजे ,पुणे ४११०५८ मोबा. ९६२३९३१८५५, ई मैल : sanjay.patil@baif.org.in

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

English