मोह हा पानगळी औषधी, धार्मिक महत्वाचा वृक्ष असून याला आदिवासीचा कल्पवृक्ष असेही म्हणतात.
मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळतात. तसेच फुला फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात. बैलघाणीत बियांचे तेल काढतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करतात. त्याच तेलाचे दिवेही ते पूर्वी जाळायचे. तेल काढल्यावर बियांची पेंढ बनवितात, तिचा खतासाठी उपयोग होतो. मोहाच्या सालीपासून रंग बनवितात. बिया वाटल्यावर तुपासारखे तेल निघते म्हणून मोहाला इंग्रजीत ‘बटर ट्री’ म्हणतात.
मोहाची फुले रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहेत. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहांच्या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. या मद्यात ब जीवनसत्त्व असते. विवाह व इतर सणांच्या दिवशी मोहाचे मद्य प्राशन करणे आदिवासी पवित्र समजतात. कोणताही आजार झाला की आदिवासी मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात.
मोहाच्या पानापासून पत्रावळ्या तयार केल्या जातात तसेच गायी गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दुध देतात.
मोहाच्या फुलापासून पुरण-पोळी आणी इतर कांही खाण्यायोग्य पदार्थ बनवतात, मोहाच्या हिरव्या फळाची भाजी करतात, पिकलेली फळे खातात याशिवाय औषधी आणी इतर अनेक उपयोगी असलेला देशी वृक्ष मोह..
मोह हा रेवती नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे त्यामुळे नक्षत्रवनात याची लागवड केली जाते.