वैशाख वणव्याने तापलेली धरती..
पावसाची प्रतिक्षा, गर्भवती माती
उनाड रानवारा, गारव्याची झुळूक
येतील, बरसतील मेघ आता
काजव्यांचा चमचमाट…
दीस उरले थोडे, होईल आषाढा सुरुवात !!
अशा या सृष्टीच्या मंतरलेल्या-मुग्ध वातावरणात, झाड-झाडोरा असलेल्या भागात हवेत जरा जास्तच आद्रता जाणवते. आता लवकरच काही दिवसात पाऊस येईल, जंगलात, रानात जमिनीच्या पोटात दडून बसलेली असंख्य बीजे अंकुरतील. कोवळे, लुसलुशीत, किरमिजी रंगांचे वीतभर लांब वाढलेले खरबी चाईचे कोंब जमिनीवर दिसू लागतात.
ऑगस्टच्या दरम्यान हिची वाढ पूर्ण होऊन हिला बार (मोहोर) लागतो. लांब-लांब मंजिऱ्यावर अनेक उपशाखांमध्ये लगडलेली, असंख्य फुले…लगडलेल्या माळीच्या मण्यासारखी. या चाईच्या मोहराची भाजी खाणे हा अनेकांचा पावसाळ्यातला नित्यक्रम. हि भाजी दिसायला माशांच्या अंड्यासारखी दिसते पण चवीला एकदम अंडा-भूर्जीसारखी लागते.